नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (शुक्रवार) देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पतधोरण समितीने जाहीर केलेल्या आर्थिक आढाव्यात, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.२५% (२५ बेसिस पॉईंट) ची कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीमुळे रेपो दर ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर खाली आला आहे. या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर वैयक्तिक कर्जांचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो रेट कमी झाल्याचा थेट फायदा त्या ग्राहकांना होतो, ज्यांनी आपले कर्ज फ्लोटिंग रेट वर घेतले आहे आणि ते थेट रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटशी जोडलेले आहे. बँका त्यांचे व्याजदर याच रेपो रेटच्या आधारावर ठरवतात. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळते आणि हा फायदा बँका ग्राहकांना व्याजदर कमी करून देतात.
रेपो रेट कपातीचा निर्णय लगेच लागू होत नाही. बँकांना तो त्यांच्या ग्राहकांना कधी हस्तांतरित करायचा, हे त्यांच्या अंतर्गत धोरणांवर अवलंबून असते. साधारणपणे, रेपो रेट कपातीचा फायदा नवीन ग्राहकांना लगेच मिळतो, तर जुन्या ग्राहकांना पुढील ३० ते ४५ दिवसांत मिळण्याची शक्यता असते.